सुनेत्रा पवार; महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री! dcm sunetra pawar

dcm sunetra pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक दिवस! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्या म्हणून इतिहास रचला आहे. हा शपथविधी सोहळा अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

शपथविधी सोहळ्याचे वर्णन: साधेपणा आणि संवेदनशीलता dcm sunetra pawar

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत लोकभवनातील दरबार हॉलमध्ये संध्याकाळी ५ वाजता हा सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव तसेच राजशिष्टाचार अधिकारी यांची उपस्थिती होती. अवघ्या १० मिनिटांत पूर्ण झालेल्या या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी मराठीतून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

शुक्रवारी रात्री बारामतीहून मुंबईत दाखल झालेल्या सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली. दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला तर छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आदी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे पत्र सादर केले. हे पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात आले आणि लगेचच शपथविधीची प्रक्रिया पूर्ण झाली.

शपथेनंतर बारामतीकडे प्रस्थान: शोककाळात संयम

शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तात्काळ बारामतीला परतणार आहेत. अजित पवार यांच्या दहाव्या पर्यंत त्या बारामतीतच राहणार असून कार्यकर्ते आणि नेत्यांची भेट घेतील. मात्र शोकाच्या पार्श्वभूमीवर कोणताही सत्कार, हार किंवा तुरे स्वीकारणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शोकाकुल वातावरणात संवेदनशीलता आणि साधेपणा जपण्यावर त्यांचा भर राहील.

सुनेत्रा पवार कोण आहेत? सामाजिक कार्य ते राजकारणापर्यंतची वाटचाल

सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहिणी आहेत. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.

ग्रामस्वच्छता अभियानाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. स्वतः हातात खराटा घेऊन पहाटे कामाला लागणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावाला या मोहिमेत सहभागी करून घेतले. परिणामी काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आले. या कामाची दखल घेत देश-विदेशातील अभ्यासकांनी गावाला भेटी दिल्या. सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली.

बारामतीमध्ये त्यांनी ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शिबिरे, वृक्षारोपण, ओढानाले खोलीकरण आणि महिलांमध्ये कर्करोग जागृती असे अनेक उपक्रम राबवले. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष म्हणून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.

राजकारणातील प्रवेश: अजित पवारांना खंबीर साथ

अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीत सुनेत्रा पवार यांनी नेहमीच घर सांभाळताना त्यांना साथ दिली. शेती, पोल्ट्री व्यवसाय ते जनसंपर्क – सर्वच क्षेत्रात त्यांचा सक्रिय वाटा राहिला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. पराभवानंतरही खचल्या नाहीत. त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली आणि तालिका अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

आता अजित पवार यांच्या जाण्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाला नवे परिमाण देणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment